अभिजीत दीपके यांच्यासह ५०० आंदोलकांवर गुन्हा

Foto
मुंबई: मुंबईच्या दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर पोलिसांची कोणतीही परवानगी न घेता आंदोलन केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी कॉकरोच जनता पार्टीचे () संस्थापक अभिजीत दिपके, साम्या कोरडे यांच्यासह सुमारे ५०० आंदोलकांवर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीच्या मुहूर्तावर सायंकाळी हे आंदोलन करण्यात आलं होतं.

परवानगी नाकारूनही जबरदस्तीने आंदोलन
मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाच्या कामकाजाविरोधात आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी  च्या वतीने शिवाजी पार्क मैदानात २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ ते ७ या वेळेत आंदोलनाची हाक देण्यात आली होती. मात्र, शिवाजी पार्क परिसर हा शांतता क्षेत्र (सायलन्स झोन) आणि रहिवासी भाग असल्याने मुंबई पोलिसांनी या आंदोलनाला पूर्वपरवानगी नाकारली होती. असे असतानाही पोलिसांचे आदेश झुगारून शेकडो आंदोलक मैदानाबाहेर जमा झाले. त्यांनी सार्वजनिक रस्त्यावर बेकायदेशीरपणे सभा भरवून मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक (लाऊडस्पीकर) लावले तसेच जोरदार घोषणाबाजी केली, असं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.

प्रमुख नेत्यांवर गुन्हे दाखल
परवानगी नसतानाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये आंदोलनाचे नेतृत्व करणारे अभिजीत दिपके, अजिंक्य शिंदे, प्रणय अहिरे, आशुतोष रांका, सौरभ दास यांच्यासह आफरीन नवाज, सोम्या (साम्या) कोरडे, अंकित भारद्वाज, विजय मळगी आणि योगेश इंगळे या प्रमुख पदाधिकार्‍यांवर आणि इतर ५०० अज्ञात आंदोलकांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

गंभीर कलमांनुसार कारवाई
मुंबई पोलिसांनी या प्रकरणी कठोर भूमिका घेत भारतीय न्याय संहितेच्या () कलम १८९(२) (बेकायदेशीर जमाव जमवणे), २२३ (सरकारी आदेशाचे उल्लंघन करणे) तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ३७(१), (३) आणि १३५ अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. सार्वजनिक वाहतुकीला अडथळा निर्माण करणे, ध्वनी प्रदूषणाचे नियम मोडणे आणि प्रतिबंधात्मक आदेशांचा भंग केल्याचा ठपका आंदोलकांवर ठेवण्यात आला असून, पोलीस आता पुढील कायदेशीर चौकशी करत आहेत.